Ad will apear here
Next
६४ घरांचा ६४वा राजा! प्रीथू गुप्ता भारताचा नवा ग्रँडमास्टर
प्रीथू गुप्तानवी दिल्ली : दिल्लीचा प्रीथू गुप्ता हा भारताचा ६४वा ग्रँडमास्टर ठरला आहे. ‘पोर्तुगीज लीग २०१९’च्या पाचव्या फेरीत इम लेव्ह यान्केलेविच याला हरवून प्रीथूने ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेल्या २५०० एलो गुणांचा निकष पूर्ण केला. विश्वनाथन आनंद हा ग्रँडमास्टर होणारा भारताचा पहिला बुद्धिबळपटू. १९८८मध्ये तो ग्रँडमास्टर झाला. त्यानंतरच्या ३१ वर्षांत ग्रँडमास्टर्सची संख्या ६४वर पोहोचली आहे.

बुद्धिबळ हा ६४ घरांचा खेळ आणि ग्रँडमास्टर हा त्या ६४ घरांचा जणू राजाच. प्रीथू ग्रँडमास्टर झाल्यानंतर विश्वनाथन आनंदने ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. ‘... आणि आता आपल्याला पूर्णत्व आले आहे. ६४वा ग्रँडमास्टर!! आपला नवा ग्रँडमास्टर प्रीथू गुप्ताचे स्वागत!’ असे ट्विट आनंदने केले आहे. प्रीथूनेही त्यावर उत्तर दिले आहे. ‘धन्यवाद, आनंद सर. तुम्ही कायम मोठे प्रेरणास्थान होतात,’ असे त्याने म्हटले आहे. 

प्रीथूने बुद्धिबळ खेळण्याची सुरुवात नवव्या वर्षी म्हणजे तुलनेने उशिरा केली. आठ मार्च २००४ ही त्याची जन्मतारीख. १५ वर्षे चार महिने आणि १० दिवसांचा असताना तो ग्रँडमास्टर पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. ग्रँडमास्टर ही जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून (फिडे) दिला जाणारा किताब आहे. त्याला पात्र होण्यासाठी खेळाडूला तीन ग्रँडमास्टर नॉर्म्स मिळवावे लागतात. कमीत कमी २७ गेम्स होणाऱ्या स्पर्धांमध्ये हे नॉर्म्स मिळविणे आवश्यक असते. कोणत्या प्रकारच्या स्पर्धांत खेळल्यास नॉर्म मिळू शकतो, याचे अत्यंत कडक निकष आहेत. त्या व्यतिरिक्त एलो गुणांचा निकषही पूर्ण करावा लागतो. ग्रँडमास्टर हा बुद्धिबळातील सर्वोच्च किताब असून, एकदा मिळाल्यावर तो आजीवन असतो.

प्रीथूने गेल्या वर्षी जिब्राल्टर मास्टर्स स्पर्धेत पहिला, तर त्याच वर्षी बाएल मास्टर्समध्ये दुसरा नॉर्म मिळवला होता. जुलै २०१९च्या सुरुवातीला पोर्टिसिओ ओपन स्पर्धेत त्याने तिसरा नॉर्म मिळवला. त्यानंतर यान्केलेविचला हरवून एलो गुणांचा निकषही त्याने पूर्ण केला. 

डी. गुकेश हा भारताचा सर्वांत लहान ग्रँडमास्टर असून, १२ वर्षे सात महिने आणि १७ दिवसांचा असताना त्याने हा किताब मिळवला. जानेवारी २०१९मध्येच त्याने हा विक्रम केला. (डी. गुकेशबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

भारताचे आतापर्यंतचे ग्रँडमास्टर्स :
विश्वनाथन आनंद (१९८८), दिव्येंदू बारुआ (१९९१), प्रवीण ठिपसे (१९९७), अभिजित कुंटे (२०००), के. शशिकिरण (२०००), पी. हरिकृष्ण (२०००), कोनेरू हम्पी (२००२), सूर्यशेखर गांगुली (२००३), संदीपन चंदा (२००३), आर. बी. रमेश (२००४), तेजस बाक्रे (२००४), पी. मंगेश चंद्रन (२००६), दीपन चक्रवर्ती (२००६), नीलोत्पल दास (२००६), परिमार्जन नेगी (२००६), गोपाल जी. एन. (२००७), अभिजित गुप्ता (२००८), एस. अरुण गुप्ता (२००८), सुंदरराजन किदाम्बी (२००९), लक्ष्मण आर. आर. (२००९), श्रीराम झा (२०१०), दीप सेनगुप्ता (२०१०), बी. अधिबन (२०१०), एस. पी. सेतुरामन (२०११), डी. हरिका (२०११), एम. आर. ललित बाबू (२०१२), वैभव सुरी (२०१२), व्यंकटेश एम. आर. (२०१२), सहज ग्रोव्हर (२०१२), विदित गुजराथी (२०१३), श्यामसुंदर एम. (२०१३), अक्षयराज कोरे (२०१३), विष्णू प्रसन्ना व्ही. (२०१३), देवाशिष दास (२०१३), सप्तर्षी रॉय चौधरी (२०१३), अंकित राजपारा (२०१४), अरविंद चिदंबरम (२०१५), कार्तिकेयन मुरली (२०१५), अश्विन जयराम (२०१५), स्वप्नील धोपडे (२०१५), सुनीलदूत लीना नारायण (२०१५), शार्दूल गागरे (२०१६), दीप्तायन घोष (२०१६), प्रियदर्शन के. (२०१६), आर्यन चोप्रा (२०१७), श्रीनाथ नारायण (२०१७), हिमांशू शर्मा (२०१७), अनुराग म्हामल (२०१७), अभिमन्यू पुराणिक (२०१७), एम. एस. तेजकुमार (२०१७), सप्तर्षी रॉय (२०१८), आर. प्रज्ञानंद (२०१८), निहाल सरिन (२०१८), ई. अर्जुन (२०१८), कार्तिक व्यंकटरमण (२०१८), हर्ष भारतकोटी (२०१८), पी. कार्तिकेयन (२०१८), स्टेनी जी. ए. (२०१८), एन. आर. विसाख (२०१९), डी. गुकेश (२०१९), पी. इनियन (२०१९), स्वयम्स मिश्रा (२०१९), गिरीश कौशिक (२०१९), प्रीथू गुप्ता (२०१९)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZMICC
Similar Posts
डी. गुकेश बनला देशातील सर्वांत लहान ग्रँडमास्टर नवी दिल्ली : चेन्नईच्या अवघ्या साडेबारा वर्षांच्या डी. गुकेशच्या रूपाने देशाला सर्वांत कमी वयाचा ग्रँडमास्टर मिळाला आहे. १७व्या दिल्ली आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना त्याने १५ जानेवारी २०१९ रोजी हा विक्रम केला. तो भारतातील पहिल्या, तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत लहान वयाचा ग्रँडमास्टर ठरला आहे
रत्नागिरीतील १० वर्षांच्या आशयला फिडे मानांकन रत्नागिरी : रत्नागिरीतील मयेकर कुटुंबाने एक वेगळीच चमकदार कामगिरी केली आहे. या कुटुंबातील आशय या १० वर्षांच्या मुलाने नुकतेच बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे. याआधी त्याचा मोठा भाऊ आयुष यानेही फिडे मानांकन प्राप्त केले असून, त्यांचे वडील जयेश मयेकरही फिडे मानांकनप्राप्त बुद्धिबळपटू आहेत
रत्नागिरीतील विवेक सोहनी झाले आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच रत्नागिरी : रत्नागिरीतील विवेक सोहनी हे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच झाले आहेत. जागतिक बुद्धिबळ संघटनेची प्रेसिडेंशिअल बोर्ड मीटिंग हंगेरी देशातील बुडापेस्ट येथे सात आणि आठ सप्टेंबरला झाली. त्या वेळी सोहनी यांच्या आंतरराष्ट्रीय पंच पदवीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. अशी कामगिरी करणारे सोहनी हे दक्षिण महाराष्ट्रातील पहिलेच ठरले आहेत
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ  संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language